यावर्षी संपूर्ण राज्यात पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला आहे. गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच कापसाने दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे राज्यात सर्वत्र कापसाच्या उत्पादनात मोठी घट नमूद करण्यात आली. खरीप हंगामात वातावरण बदलामुळे कापूस समवेतच खरीप हंगामातील इतर पिकांना मोठा फटका बसला होता, कापसावर बोंड आळीचे सावट संपूर्ण हंगामभर कायम राहिले होते.
निसर्गाच्या या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली, तसेच या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी बघायला मिळाली. यामुळे राज्यात कापसाला विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले गेले. मात्र आता कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असता आणि राज्यात पुनश्च एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने, तसेच गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण कायम असल्याने याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी लक्षणीय कमी झाल्याने कापसाच्या बाजार भावात मोठी घसरण झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे.
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात चिखली येथील महादेव कॉटन जिनिंग मध्ये मागील काही दिवसांपर्यंत 9 हजार 900 रुपये प्रति क्विंटल या दराने कापसाची विक्री होत होती. मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी कमी झाल्याने महादेव जिनींग मध्ये देखील कापसाच्या भावात 550 रुपयापर्यंतची घसरण नमूद करण्यात आली. सध्या महादेव जिनींग मध्ये नऊ हजार 350 रुपये प्रति क्विंटल या दराने कापसाची विक्री होत आहे.
यावर्षी कापसाचा बाजारभाव काही शेतकऱ्यांना आनंद देऊन गेला तर काही शेतकऱ्यांना यामुळे विशेष असा लाभ प्राप्त झाल्याचे दिसत नाहीये. हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील अल्पभूधारक व गरजवंत शेतकऱ्यांनी आर्थिक अडचण असल्याकारणाने सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतच्या मामुली दराने मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री करून टाकली, त्यामुळे मध्यंतरी वाढलेला कापसाचा बाजार भाव अशा शेतकऱ्यांसाठी विशेष लाभदायक सिद्ध झाला नाही. मात्र असे असले तरी मध्यंतरी प्राप्त झालेली कापसाची झळाळी अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मालामाल बनवून गेली आहे.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, या हंगामात कापसाच्या क्षेत्रात मुबलक प्रमाणात घट झाली, तसेच हंगामाच्या सुरुवातीला पावसाच्या लहरीपणामुळे कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंड आळीचा प्रादुर्भाव नजरेस पडला, या संयुक्त कारणामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली.
याशिवाय मध्यंतरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी होती आणि याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेत दिसून आला आणि कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. मात्र आता कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून बाजारभावात कमालीची घसरण बघायला मिळत आहे याचे कारण असे की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या वेळी मंदी बघायला मिळत आहे त्यामुळे कापसाच्या दरात पडझड झाल्याचे चित्र दिसत आहे.
Share your comments