खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील मुख्य पीक कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. याचाच परिणाम म्हणून कापसाची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली, कापसाला असलेल्या मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच नगण्य होता म्हणून कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. जागतिक बाजारपेठेत कापसाला मोठी विक्रमी मागणी असल्याने कापसाला विक्रमी दर प्राप्त होत असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले गेले, असे असले तरी मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात कापसाचे दर जवळपास सहा सेंट प्रति पाउंड एवढे खाली आले आहेत. मात्र यादरम्यान सरकीला मागणी वाढल्याने आणि त्याच्या दरात तेजी असल्याने कापसाच्या बाजारभावात देखील झळाळी बघायला मिळत आहे.
उत्पादनात घट झाली असताना देखील या हंगामात सुरुवातीला कापसाच्या बाजार भावात मोठी चढ-उतार बघायला मिळत होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कापसाचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कायम राहिले आहेत. असे असले तरी, राज्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकरी दरवाढीच्या अनुषंगाने अजूनही सावध पवित्रा अंगीकारत टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करीत आहेत त्यामुळे बाजारपेठेत अपेक्षित कापसाची आवक बघायला मिळत नाही. सध्या देशांतर्गत बाजारपेठेत मध्यम लांब व लांब धाग्याच्या कापसाला अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे, तर अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाला जवळपास चौदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. सरकीचे दर देशांतर्गत जवळपास दोनशे रुपयांपर्यंत वाढले असल्याने कापसाच्या बाजार भावात तेजी बघायला मिळत आहे.
आगामी काही दिवसात जर सरकीचे दर असेच वाढत राहिले तर कापसाचे दर 11 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या अतिरिक्त लांब अर्थात 32 मिमी पेक्षा लांब धाग्याच्या कापसाला देशांतर्गत 14 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे, मित्रांनो या कापसाचे उत्पादन आपल्या राज्यात खूपच नगण्य आहे.
या कापसाचे उत्पादन सर्वात जास्त तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात बघायला मिळते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, सध्या सरकीच्या दरात चढ-उतार बघायला मिळत आहे मात्र असे असले तरी येत्या काही काळात सरकीचे दर स्थिर होणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे आगामी काही काळासाठी कापसाच्या दरात तेजी बघायला मिळू शकते.
Share your comments