1. बातम्या

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन

KJ Staff
KJ Staff


अमरावती:
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 से. तापमान असतांना सामान्यत: गुलावी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर येत आहेत. हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेल्या पतंगांचे मिलन होऊन त्यांनी अंडी टाकल्यांनतर 8 ते 10 दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवी बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बंधुनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

कापूस पिकात त्वरीत किमान दोन फेरोमन सापळे लाऊन त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरेक्टीन 1,500 पीपीएम 25 मिली/10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बोंडे/पात्या/फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यापर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी 20 ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस, 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्के पेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेली मिश्र किटकनाशके जसे प्रोफेनोफॉस 40 टक्के+सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1+ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 12.50 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50+सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

शेतकरी बंधुंनी पिकाचे नियमित निरीक्षण करुन कामगंध सापळ्यामधील पतंगाच संख्या व प्रादुर्भाव तसेच सध्याच्या कापूस पिकाच्या वाढलेल्या हंगामामध्ये कापूस पिकाची संपूर्ण वेचणी झाल्यानंतर (एक ते दिड महिण्यामध्ये) कापसावर असलेली बोंडाची संख्या व अपेक्षीत उत्पन्न यांचा अंदाज घेऊन कीड व्यवस्थापनाची वरीलप्रामणे उपाय योजना करावी. सरसकट सर्व शेतकरी बंधुनी कीड व्यवस्थापनाची उपाययोजना करु नये. 

डिसेंबर 2019 नंतर कापूस पिक पुर्णत: काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा जेणेकरुन किडीचे जीवनच्रक खंडीत होऊन येणाऱ्या पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रतिबंध करण्यास मदत होईल, असे विभागीय कृषी सहसंचालक, सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters