खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील मुख्य पिकांना मोठा फटका बसला होता, यात कापूस आणि सोयाबीन पिकाचा देखील समावेश आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली शिवाय दिवसेंदिवस वाढत असलेल्या मंजुरीमुळे तसेच वर्षानुवर्षे मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करण्यास असमर्थता दर्शवली यामुळे देखील कापसाच्या उत्पादनात घट होणार होती. कापसाच्या उत्पादनात घट होईल असा अंदाज बांधावरील शेतकऱ्यांना ते एसी मध्ये बसलेल्या विशेषज्ञाना देखील होता. उत्पादनात घट झाली म्हणजे बाजारभावात वाढ होते हे बाजारपेठेतील सूत्र आहे, परंतु कापसाच्या हंगामाच्या सुरुवातीला बाजारपेठेतील हे सूत्र उलट झाले होते कारण की हंगामाच्या सुरुवातीला कापसाला अपेक्षित असा बाजारभाव प्राप्त होत नव्हता.
परंतु मध्यंतरी कापसाची झळाळी विशेष नमूद करण्यासारखी आहे. सध्या हंगामाच्या सुरुवातीला मिळत असलेल्या दरापेक्षा सुमारे साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल अधिक दर मिळत आहे. सध्या राज्यात सर्वत्र कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलहून अधिक बाजारभाव मिळत आहे. परंतु असे असले तरी याचा फारसा फायदा कापूस उत्पादकांना होताना बघायला मिळत नाही, याचे कारण असे की, सुरुवातीला जेव्हा कापसाच्या बाजार भावात घसरण होती त्यावेळीच अनेक कापूस उत्पादकांनी आपल्या जवळचा कापूस विक्री करून टाकला. त्यामुळे सध्या मिळत असलेला कापसाचा दर हा केवळ कापूस व्यापाऱ्यांनाच मालामाल करत आहे. सध्या मिळत असलेला कापसाचा दर हा विक्रमी असला तरी यामुळे शेतकरी बांधव मालामाल होत नसून कापूस खरेदी करणारे व्यापारी मालामाल होत असल्याची वास्तविकता उघड आहे. हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे जवळपास पाच महिन्यांपूर्वी कापसाला केवळ पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच नगण्य दर मिळत होता. त्यावेळी कापसाला जरी कमी दर मिळत होता तरीदेखील पैशांची चणचण असल्याने आणि कापूस उत्पादकांनी आपल्या जवळचा कापूस विक्री करून टाकला.
फक्त बड्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळचा कापूस साठवण्याची हिम्मत दर्शवली, तसेच यामध्ये देखील वातावरणाच्या बदलामुळे कापूस पिकावर झालेल्या विपरीत परिणामामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वावरातील कापूस केवळ एका वेचणीतच संपुष्टात आला. त्यामुळे अनेकांनी सुरुवातीला कापूस विक्री केल्यामुळे फारसे उत्पन्न पदरी पडले नाही तर अनेकांना कापसाचे अत्यल्प उत्पादन प्राप्त झाल्याने पदरी कवडीमोल उत्पन्न पडले. सध्या कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव प्राप्त होत आहे. असे असले तरी, बडे शेतकरी वगळता छोट्या आणि गरीब शेतकऱ्यांकडे या घडीला कापूस शिल्लक नाही त्यामुळे या भाववाढीचा फायदा फार थोड्या शेतकऱ्यांना होत आहे, मात्र या भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक होत असल्याचे बघायला मिळत आहे. अजूनही थोड्याफार बड्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे मात्र त्यांना देखील आत्ता याचा फायदा होतो की नाही याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे, कारण की सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार घमासान सुरू आहे.
रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत विशेषता कापसाच्या बाजारपेठेत मोठी मंदी बघायला मिळत आहे. सध्या, पहिल्या वेचणीतील चांगली गुणवत्ता असलेल्या कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वेचणीतील कापसाला केवळ साडे सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत आहे. एकंदरीत, मध्यंतरी कापसाला मिळत असलेल्या विक्रमी दराचा फायदा शेतकऱ्यांना फार अल्प प्रमाणात झाला मात्र कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा खूप मोठा फायदा झाला. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने कापूस खरेदीदारांनी कापूस खरेदी करण्यास ब्रेक लावला आहे आणि आपल्याजवळ साठवलेला कापूस विक्री करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
Share your comments