1. बातम्या

पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी कापसाचा फरदड घेऊ नये

नोव्हेबर व डिसेंबर महिन्यात रात्रीच्या तापमानात घट व रात्रीचा कालावधीत वाढ होत असल्याने गुलाबी बोंडअळीच्या पतंगाना उपजीविकेसाठी अनुकुल वातावरण ठरत आहे. त्याकरीता सद्य परिस्थितीत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असुन पुढीलप्रमाणे उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किडकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.

KJ Staff
KJ Staff


नोव्हेबर व डिसेंबर महिन्यात रात्रीच्या तापमानात घट व रात्रीचा कालावधीत वाढ होत असल्याने गुलाबी बोंडअळीच्या पतंगाना उपजीविकेसाठी अनुकुल वातावरण ठरत आहे. त्याकरीता सद्यपरिस्थितीत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असुन पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किडकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठी कामगंध सापळयाचा वापर करुन मोठया प्रमाणात सामुहिकरीत्या नर पतंग गोळा करुन नष्ट करावेत. जिनींग-प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवणकेलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामगंध सापळयातील ल्युर बदलून नवीन ल्युर लावावे. डिसेंबर महीन्यात कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्या मध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्‍याची शक्यता असुन पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्‍या शेतातील अवशेष नष्ट करणे अवश्यक आहे.

डिसेंबर नंतर कपाशीचे पिक ठेवल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळते, आणि अळीच्या जीवनक्रमांच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होते, तसेच बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारकता निर्माण होते. डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील 5 ते 6 महिने कापूस पीक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते, त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबर नंतर खाद्य उपलब्‍ध नसल्यास अळी सुप्तअवस्थेत जाते. परंतू फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो म्हणून कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. 

कापूस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा या वापर करावा व तयार झालेला पिकाचा चुरा गोळा करुन सेंद्रिय खतामध्ये रुपांतरीत करावे. पीक काढणीनंतर खोल नांगरणी करुन जमिन उन्हात चांगली तापू दयावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे.

फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर सिंचन उपलब्ध असलेल्या जमिनीवर पाणी देऊन पुनश्च कापूस पिक घेतले जाते. अशावेळी पिकापासून जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशके यांचा वापर करून मार्च महिन्यानंतरही कापूस पिक घेतले जाते. फरदड कपाशीला सिंचित केल्याने पाते, फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंडअळीला सतत खाद्य उपलब्ध होते.

फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही त्यामुळे धाग्याची मजबुती व रुईचा उतारा घटून कापसाला बाजारभाव कमो मिळतो. कापसाची फरदड घेतल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. कापूस पिकाचा कालावधी जसजसा वाढत जातो त्याप्रमाणे त्यामधील बीटीप्रथिनाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बोंड अळ्यांमध्ये बीटी बीटी प्रथिना विरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते. खरीप हंगामात पिठ्या ढेकुण व पांढरी माशीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास त्याचा फरदड कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन घट होते व पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड कपाशी न घेण्याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

English Summary: Cotton crop should not take a cotton blade to prevent the attack of pink bollworm in next season Published on: 02 December 2018, 03:25 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters