यवतमाळ : बदललेले पर्जन्यमान, खर्चाच्या तुलनेत कापसाला असलेला हमीभाव यातच उद्भवलेले कोरोनाचे संकट आदी कारणांमुळे देश तसेच राज्यात कापसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. दुसरीकडे विदर्भात गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र वाढले आहे. सध्या कापसाचे दर वाढले आहे. हवामान तसेच रोग न आल्यास यंदा कापूस शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देण्याची शक्यता आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांचे कापूस हुकमी पीक म्हणून ओळखले जाते. याला वेगवेगळी कारणे आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात कापूस शेतकऱ्यांना मोठा आधार देतो. खर्च जास्त असतानाही शेतकरी या पिकांना प्राधान्य देतात. याशिवाय, सिंचनाचा प्रश्नही आहे. विदर्भाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र सिंचनाच्या बाबतीत ‘सुजलाम् सुफलाम्’आहे. या ठिकाणी पारंपरिक पिकांऐवजी इतर पिकांनाही प्राधान्य दिले जाते.
विदर्भात कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे. सिंचन कमी आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांकडून कापसाला प्राधान्य दिल्या जात असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. परिणामी, विदर्भात कापसाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.
गेल्या वर्षी देशात १३३ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा यात घट झाली असून, ११५ ते १२० लाख हेक्टरवरच लागवड झाली आहे. राज्यातही तशीच स्थिती आहे. गेल्या वर्षी ४२.८८ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ३९.३५ लाख हेक्टरवरच लागवड झाली आहे. विदर्भात या उलट स्थिती आहे. अमरावती विभागात गेल्या वर्षी दहा लाख १४ हजार हेक्टरवर लागवड होती. ती यंदा दहा लाख ५० हेक्टर झाली आहे.
दरम्यान, नागपूर विभागात सहा लाख २० हजार हेक्टरवर असलेली लागवड यंदा सहा लाख २४ हजार हेक्टर झाली आहे. यंदा कापसाला चांगले भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना हवामान तसेच कपासावर येणारी रोगराई न आल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना कापूस फायद्यांचा ठरू शकतो.
लागवडीतील घट-वाढ
देश – घट १३ लाख हेक्टर
राज्य – घट ३.५३ लाख हेक्टर
विदर्भ विभागनिहाय
नागपूर – वाढ ४ हजार हेक्टर
अमरावती – वाढ ३६ हजार हेक्टर
विदर्भ एकूण – वाढ ४० हजार हेक्टर
Share your comments