खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या उत्पादनात यावर्षी मोठी घट झाली. दरवर्षी कापसाच्या उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने आणि मजूरटंचाई जाणवत असल्याने खान्देशसमवेतच राज्यातील इतर भागात कापसाच्या लागवडीत घट झाली. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यात देखील कापसाच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. या खरीप हंगामात तयार झालेल्या या समीकरणामुळे कापसाच्या उत्पादनात घट ठरलेलीच होती.
कापसाच्या उत्पादनात यावर्षी तब्बल पाच लाख गाठींची घट घडली असल्याची धक्कादायक माहिती भारतीय कापूस उत्पादक संघाने दिली आहे. या हंगामात सप्टेंबर अखेरपर्यंत कापसाची सर्वत्र काढणी चालू असल्याचे बघायला मिळाले. कापूस उत्पादक संघाच्या मते या हंगामात 343 लाख कापूस गाठीचे उत्पादन झाले असेल. दरवर्षी कापसाचे साडेतीनशे लाख गाठींचे उत्पादन भारतात बघायला मिळते मात्र यामध्ये आता मोठी घट झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्य अर्थात तेलंगणामध्ये हंगामाच्या सुरुवातीला निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला, त्यामुळे तेथील कापसाचे उत्पादन कमालीचे कमी झाले. शिवाय कापसाचा वापर देखील दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे बाजारपेठेतील सर्व चित्र या हंगामात बदलताना दिसत आहे.
या हंगामात कापसाच्या उत्पादनात तब्बल पाच लाख गाठींची कमतरता असल्याचे सांगितले जात आहे. प्रमुख कापूस उत्पादक राज्य तेलंगणामध्ये जवळपास दोन लाख गाठीची कपात नमूद करण्यात आली आहे. तेलंगणा पाठोपाठ गुजरात कर्नाटक या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घटले आहे. ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 या काळात 114 लाख गाठ कापूस वापरण्यात आला आहे. तर जानेवारी 2022 पर्यंत 25 लाख गाठी निर्यात करण्यात आल्या आहेत. सध्या जागतिक बाजारपेठेत कापसाच्या मागणीत वाढ झाली असल्याने कापसाचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत मात्र वाढत्या दराचा फटका कापूस निर्यातदारांना होत असल्याचे सांगितले जात आहे.
या हंगामात कापसाचे दर तब्बल 80 टक्क्यांनी वाढले असल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच टेक्सटाइल उद्योगाणे कापसाच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार दरबारी अनेक मागण्या केल्या होत्या. यामध्ये कापसाच्या निर्यातीवर नियंत्रण, आयात शुल्क दहा टक्क्यांनी कमी करणे यासारख्या अनेक मागण्या समाविष्ट केल्या होत्या. कापसाच्या वाढत्या दरामुळे टेक्सटाइल इंडस्ट्रीजला तसेच कापूस निर्यात करणाऱ्या निर्यातदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जर पुढच्या हंगामात देखील कापसाच्या उत्पादनात घट झाली सर टेक्सटाइल इंडस्ट्रीचे कंबरडे मोडेल असे सांगितले जात आहे. संदर्भ-टीव्ही9
Share your comments