मुंबई : कोरोनामुळे (Corona) सगळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात मिनी लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. आता याचा राज्यातील कृषी विद्यापीठांवर (University of Agriculture) परिणाम पाहायला मिळणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील कृषी विद्यापीठे हे बंद राहणार आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देण्याचे आदेश राज्य शासनाने 4 ही कृषी विद्यापीठांना दिलेले आहेत. 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे तर त्यानंतर राज्यातील कोरोनाची परस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. यासंबंधी कृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना (Registrar of Agricultural University) शासनाने आदेश दिले आहेत.
त्यानुसार कृषी विद्यापीठे, विद्यापीठांना संलग्न असणारे विद्यालये आणि महाविद्यालये यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठांमध्ये असेलली विद्यार्थ्यांची संख्या, वसतीगृहामध्ये असलेली राहण्याची सोय यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कुलसचिवांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
कृषी विद्यापीठातील कुलसचिवांच्या बैठकीत झाले हे निर्णय
१. कृषी विद्यापीठातील पदवीच्या आठव्या सत्रातील वर्ग हे ऑफलाईनच सुरु राहणार आहेत.
२. पदवीचे एक ते सात सत्रातील वर्ग हे ऑनलाईनच सुरु राहणार आहेत.
३. पदव्युत्तराचे संशोधन व प्रबंधांची कामे ही ऑफलाईनच होणार आहेत. तर त्यांची वसतीगृहे ही बंद राहणार आहेत.
४. कृषी तंत्र विद्यालयांचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे वर्ग हे ऑनलाईनच होणार आहेत.
५. तंत्रनिकेतनाचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे वर्ग हे देखील ऑनालाईनच होणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये राहूनच ऑनलाईनव्दारे शिक्षण घेता येणार का वसतीगृहेही बंद राहणार याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. 15 फेब्रुवारीनंतर परस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय होणार आहे. शिवाय ऑफलाईन वर्ग सुरु होत असताना विद्यार्थ्यांना पालकांचे संमती पत्र महाविद्यालयात अदा करावे लागणार आहे.
Share your comments