कोरोना व्हायरसचा परिणाम व्यापार, शेती त्यानंतर आता पर्यटन उद्योगावर होत आहे. यामुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. देशात हा आजार पसरु, नये यासाठी सरकार दक्षता घेत आहे. सरकारने सर्व व्हिजा निलंबित केले आहेत. कोरोना व्हायरस हे एक मोठे संकट असल्याचे भारतीय उद्योग परिसंघाने म्हटले आहे. भारतीय पर्यटन उद्योगासाठी हे सर्वात वाईट संकटांमधील एक आहे.
यामुळे देशातील पर्यटन उद्योगासह पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्या सर्व नागरिकांवरही याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्र राज्यात देशाच्या विविध राज्यातून चार कोटी आणि परदेशातून सुमारे २० लाख पर्यटक येत असतात. पर्यटन उद्योगाशी संबधित हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट्स, पर्यटन सेवा देणाऱ्या कंपन्या, मनोरंजन पार्क, आदी उद्योगांवर याचा परिणाम होणार आहे. सीआयआयच्या पर्यटन समितीने कोरोना व्हायरसचा पर्यटन उद्योगावर होणारा परिणामाची व्याप्ती जाणून घेतली आहे. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षाला ६० ते ६५ टक्के असते. भारताला परदेशी पर्यटकामधून २८ अब्ज डॉलरपेक्षा जास्त उत्पन्न मिळते. कोरोना व्हायरसविषयीच्या बातम्या नोव्हेंबरपासून सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तिकीट हॉटेल्स, आदींचे बुकिंग रद्द केले जात होते. मार्च महिन्यात भारतीय पर्यटन स्थळांवरील बुकिंग ८० टक्क्यांनी कमी झाले आहे.
Share your comments