करोना व्हायरसचा व्यापारावर मोठा परिणाम होत आहे. चीननंतर जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसमुळे व्यापार ठप्प पडले आहेत. या व्हायरसचा परिणाम हापूस आंब्याच्या निर्यातीवर झाला असून शेकडो टन हापूस आंबा बाजारात पडून आहे. करोनाच्या धास्तीने आखाती देशांनी हापूस आंब्याची निर्यात थांबवली आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे करोनाचा फटका आंबा बागायतदारांना बसणार आहे. आता सध्य बाजारात आंब्याची पेटी ६ हजार रुपयांना विकली जात आहे. परंतु करोनामुळे पेटीचा दर कमी होण्याची शक्यता आहे.
वाशी मार्केटमध्ये दररोज ४ हजार आंब्याच्या पेटी येत असतात. मात्र निर्यातीवर बंदी असल्यामुळे शेकडो टन आंबा पडून आहे. दरम्यान भारतात १.८७ कोटी लाख टन आंब्याचे उत्पादन घेतले जाते. आंब्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा ४१ टक्के इतका आहे. जगातील ५० देशांमध्ये आंब्याची निर्यात केली जाते. देशातील आंबा उत्पादनात महाराष्ट्र पहिला नाही. पण आंब्याच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्र पाच लाख ६६ हजार हेक्टर आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
Share your comments