आजपासून मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकाने सुरू करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रेसनोटनुसार, गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. परंतु कंटेनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बाजारपेठांमधील दुकाने मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसेच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल.
मद्य विक्री करणाऱ्या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचेही स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे, असेही सरकारने स्पष्ट केले. दरम्यान काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासण्यात आले आहे. जळगावातील आंबा लिलावावेळी लोकांची गर्दी उसळल्याने सोशळ डिस्टन्सिंगला हरताळ फासल्या गेल्या आहे. यासह नागपूरमध्ये भाजीपाला बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली होती.
Share your comments