कृषी विभागाने उत्कृष्ट काम केल्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या 516 गावांपैकी 428 गावांमधील बोंडअळी नियंत्रणात आली आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी विभागाच्या आढावा बैठकीत दिली. बोंडअळी नियंत्रणात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी श्री.खोत यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आत्माचे कृषी संचालक अ. उ. बनसोडे, कृषी आयुक्तालयाचे के. एस. मुळे, कृषी उपसंचालक सुभाष घाडगे, नाशिकचे कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव, कक्ष अधिकारी उमेश चांदिवडे आदी उपस्थित होते.
राज्यामध्ये कापूस पट्टयात २० हजार १६० गावांचा समावेश आहे. बोंडअळीबाबत कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर तसेच आकाशवाणीवरुन नियमितपणे बोंडअळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम प्रसारित केले. एम-किसान पोर्टल वरुन कृषी सल्ले देण्यात आले. तसेच कृषी सहाय्यकांनी कापसाच्या प्रत्येक क्षेत्राला भेट देऊन पीक परिस्थितीचा आढावा घेतला तसेच क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून नियमित संनियंत्रण केले. प्रादुर्भाव आढळून आलेल्या गावांमध्ये बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागासह कृषी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग घेतला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कामगंध सापळे पुरविले तसेच कृषी विभागाने कीटकनाशके उपलब्ध करुन दिल्याने एकात्मिक पद्धतीने बोंडअळी नियंत्रणात आली, असे श्री. खोत म्हणाले.
श्री. खोत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया अभियानात समाविष्ट प्रकल्पांना सद्या राष्ट्रीयकृत बँका तसेच अधिसूचित बँकांच्या (शेड्यूल्ड बँक) माध्यमातून पतपुरवठा करण्यात येतो. मात्र या अभियानाला गती देण्यासाठी त्यामध्ये सहकारी बँकाचाही सहभाग करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्याला गती द्यावी. कृषी सहायक तसेच गट शेती सबलीकरण योजनेत मंजुरी दिलेल्या गटांचे शेतकरी यांच्यासाठी संबंधित विभागीय पातळीवर प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. गट शेतीच्या कामाला अपेक्षित गती देण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
Share your comments