पुणे : उत्तरेकडील राज्यातून बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. बटाट्यापाठोपाठ कांद्याच्या दरातही घट झाली आहे. शेतकऱ्यांकडून साठवणुकीतील कांदा राज्यातील घाऊक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. आवक वाढल्यामुळे कांदा-बटाटा स्वस्त झाला असून ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. नवीन कांद्याचा हंगाम एक-दीड महिन्यात सुरू होण्याची शक्यता असल्याने जुना साठवणुकीतील कांदा शेतकरी बाजारात विक्रीसाठी पाठवित आहेत. या कांद्याला मध्यम प्रतीचे दर मिळत आहेत.
गेल्या वर्षी नवीन कांदा लागवडीला अतिवृष्टीचा फटका बसला. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात येथेही अतिवृष्टीमुळे नवीन कांदा लागवडीवर परिणाम झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षी किरकोळ बाजारात कांद्याचे दर वधारले होते. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री प्रतवारीनुसार ७० ते ९० रुपये या दराने केली जात होती. गेल्या वर्षी संपूर्ण देशातून महाराष्ट्रातील साठवणुकीतील जुन्या कांद्याला मोठी मागणी होती.
यंदाच्या वर्षी जुना कांद्याची साठवणूक मुबलक प्रमाणावर करण्यात आली आहे. मागणीच्या तुलनेत आवक चांगली होत आहे. त्यामुळे कांदा दर उतरले आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात येथे कांदा लागवड चांगली झाली आहे. महाराष्ट्रातील कांद्याचा हंगाम पुढील एक ते दीड महिन्यात सुरू होईल. अतिवृष्टी न झाल्यास कांद्याची लागवड चांगली होईल आणि दरातही वाढ होणार नाही. सध्या घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला प्रतवारीनुसार १५० ते १६० रुपये असा दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार १५ ते २० रुपये दराने कांद्याची तसेच बटाट्याची विक्री केली जात आहे, असे पोमण यांनी नमूद केले.
उत्तरेकडील आग्रा, मध्यप्रदेश भागात बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेथील शेतकरी बटाटा शीतगृहात साठवितात. शीतगृहात बटाटा साठवणुकीचे करार नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात संपतात. त्यानंतर नवीन बटाट्याचा हंगाम सुरू होतो. अशा परिस्थितीत बटाटा साठवणूक करणे योग्य ठरत नाही. त्यामुळे उत्तरेकडील राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर बटाटा विक्रीस पाठवित आहेत. घाऊक बाजारात एक किलो बटाट्याला १० ते १३ रुपये असा दर मिळत आहे.
शेतकऱ्यांनाही फायदा
नवीन कांदा-बटाट्याचा हंगाम येत्या दोन- तीन महिन्यात सुरू होईल. त्यामुळे कांदा-बटाट्याची साठवणूक फार काळ करणे शेतक ऱ्यांना परवडणार नाही. कांदा निर्यातीला फार चालना नाही. अशा परिस्थितीत शेतक ऱ्यांनी फायद्याचा विचार न करता साठवणुकीतील जुना कांदा-बटाटा विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. आवक वाढल्यामुळे किरकोळ बाजारातील कांदा, बटाट्याचे दरही उतरले असून घाऊक बाजारातील दरात मोठी घसरण नसल्याने शेतकऱ्यांनाही समाधानकारक दर मिळत आहेत.
Share your comments