गेल्या काही दिवसांपासून शेतकरी हा अनेक अडचणीचा सामना करत आहे. असे असताना जर शेतीमधून उत्पन्न मिळाले नाहीत, तर शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून पैसे मिळतील अशी आशा असते. असे असताना कोरोना आल्यापासून त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. दुधाचे भाव कमी असताना मात्र इतर खाद्याचे दर हे मोठ्या प्रमाणावर वाढत होते. मात्र तरी देखील त्यांनी आपली जनावरे संभाळली. असे असताना आता दूधउत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दोन वर्षानंतर सध्या गायीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून बाजारात लोणी व दूध बुकटीच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी दोन वर्षानंतर का होईना गायीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गायीच्या दूधाला 30 रुपये दर मिळत असून यामध्ये दोन रुपयांची वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे दूधाच्या दरात वाढ होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम आहेत. पशूखाद्याचे दर हे दर महिन्याला वाढत आहेत तर दूधाचे दर हे दोन वर्षातून वाढले आहेत. त्यामुळे ही दरी कशी भरुन काढावी हा प्रश्न कायम आहे. मात्र काहीसा दिलासा यामुळे मिळणार आहे.
सध्या पावडरचे दर हे 180 रुपयांवरुन आता 270 रुपये किलोंपर्यंत पोहचलेले आहेत, तर दुसरीकडे लोण्यापासून तयार होणारे बटर हे 240 वरुन 350 रुपये किलो असे विकले जात आहे. त्यामुळे खासगी डेअरीमधील पावडर व लोण्याचे साठे कमी होत आहेत. परिणामी गायीच्या दरात वाढ झाली आहे. कोरोनामध्ये याची विक्री कमी झाल्याचे दर वाढत नव्हते. यामुळे पदरमोड करून शेतकऱ्यांनी दिवस काढले आहेत. मात्र आता त्यांना काहीसा फायदा होणार आहे. तसेच जागतिक बाजारपेठेतही दुग्धजन्य पदार्थाच्या किमती या वाढत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात दुधाला चांगले दिवस येणार आहेत.
दुग्धजन्य पदार्थांना अशीच मागणी राहिली तर गायीच्या दूध दरात अणखीन वाढ होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. असे असले तरी फक्त दोन रुपये वाढून काही होणार नाही. गेल्या एक वर्षात जनावरांचे खाद्य हे तब्बल दुप्पट किमतीने वाढले आहे. यामुळे हा मेळ कसा घालायचा असा प्रश्नही अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला जात आहे. ६०० च्या घरात असलेले खाद्याचे पोते हे आता एक हजार ते १२०० च्या दरम्यान आहे. यामुळे अजूनही हा धंदा नफ्यात नसल्याचे दूध उत्पादक सांगतात.
Share your comments