डाळिंबाची बाग ही कमी पाण्यात तसेच खडकाळ माळरानावर सुद्धा चांगल्या प्रकारे बहरते. डाळिंबाचे पीक घेण्यास शेतकरी नेहमी उत्सुक असतात मात्र पीक बहरत असताना त्यावर किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो. मागील ३ वर्षांपासून तर वातावरणाच्या बदलामुळे कीड आणि रोगराईचे प्रमाण वाढतच निघाले आहे. पीन, होल बोरर, रसशोषक कीड, फळकूज या किडीचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनाचे क्षेत्र ही घटतच चालले आहे. या सर्वांबाबत कृषी विभागाने आढावा घेत एक मोहीम राबिवण्याचे ठरवले आहे. आता डाळिंब उत्पादकांच्या थेट बांधावर कृषितज्ञ आणि कृषी अधिकारी येऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
डाळिंब बागांना नेमका धोका कशाचा ?
महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे १ लाख ७१ हजार हेक्टरवर डाळिंबाचे क्षेत्र आहे. जरी उत्पादनासाठी डाळिंब पीक घेणे जेवढे सोपे आहे तेवढेच रोगराई किंवा किडीचा प्रादुर्भाव पडताच अवघड होतं जाते. एकदा की डाळिंब पिकावर किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव झाला की शेतकरी तिकडे दुर्लक्ष करतात. पीन, होल बोरर यासारख्या किडीवर तर अजून औषध च नाही. यंदाच्या वर्षी डाळिंब बागेवर पीन होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने डाळिंब उत्पादकांनी बागाच मोडलेल्या आहेत. ज्यावेळी डाळिंबाच्या बागा बहरत असतात त्याचवेळी पीन होल बोरर, रसशोषक कीड, सूत्रकृमी, फळकूज या किडीचा प्रादुर्भाव होतो. वर्षभर डाळिंबाची बाग बहरण्यासाठी लागणारा खर्च आणि पदरी पडते ते नुकसानच. पुणे, नगर, नाशिक आणि सांगली जिल्ह्यात डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र उत्पादनाचा भरोसा नसल्यामुळे डाळिंब पिकाच्या क्षेत्रात घट होत निघाली आहे.
कृषी विभागाचे काय आहे नियोजन?
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात केंद्रीय पथकाने डाळिंब बागेची पाहणी केली होती, त्यावेळी पासून यावर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली होती. डाळिंब उत्पादकांच्या थेट बांधावर जाऊन कृषितज्ञ व कृषी अधिकारी डाळिंब रोपवाटीकेची पाहणी करणार आहेत. राष्ट्रीय संशोधन केंद्रे, विद्यापीठे, डाळिंब उत्पादक संघ आणि कृषी विभाग हे संयुक्त काम करणार आहेत. शेतकऱ्यांपर्यंत कीड आणि रोगराई व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्र पुरवली जाणार आहेत.
अशी घ्यावी लागणार शेतकऱ्यांना काळजी :-
डाळिंब उत्पादकांनी ज्यावेळी डाळिंबाची लागवड करायची आहे त्यावेळी अतिघन लागवड करायची नाही तसेच लागवड करतेवेळी ४.५ मीटर बाय ३ मीटर तर दोन रांगांमध्ये ५ बाय ५ मीटर अंतर ठेवावे.किडनियंत्रण करण्यासाठीकुजलेले कंपोस्ट खत व जैविक कीडनाशकांचा वापर करावा. तसेच कृषी अधिकारी आणि कृषितज्ञ व कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून डाळिंब बागेला नवसंजीवनी भेटणार आहे.
Share your comments