परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांकरिता सेंद्रीय शेतीवर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन प्रत्येक जिल्ह्यातून शंभर शेतकऱ्यांना यात प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्याचे आत्मा (कृषी विभाग) प्रकल्प संचालक व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या कडुन संयुक्तपणे 80 व संबंधित जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र व थेट विद्यापीठ यांच्या माध्यमातुन प्रत्येकी दहा शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
सदरिल प्रशिक्षणाची सुरवात परभणी जिल्ह्यापासुन करण्यात येणार असुन दिनांक 28 ते 30 नोव्हेबर दरम्यान हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तसेच हिंगोली जिल्हयासाठी 2 ते 4 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 28 नोंव्हेबर रोजी विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीतील सभागृह क्र.18 येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण राहणार आहे. तसेच संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, प्युअर ऑरगॅनिक ग्रुपच्या अध्यक्षा सौ. स्वाती शिंगाडे, रायपुर (छत्तीसगड) येथील राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनिल दिक्षीत आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्त्रज्ञ, देशातील व राज्यातील सेंद्रीय शेतीतील शास्त्रज्ञ व तज्ञ शेतकरी सेंद्रीय पिक लागवड तंत्रज्ञान, जैविक किड व्यवस्थापन, जैविक रोग व्यवस्थापन, सेंद्रीय पध्दतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रीय प्रमाणीकरण, सेंद्रीय बाजारपेठ, व सेंद्रीय शेतकरी यशोगाथा अशा विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचा जास्तीतजास्त महिला शेतकरी व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी केले.
Share your comments