मुंबई: अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठोस मदत करण्यासाठी आणि त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बैठकीस मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, डॉ. नितीन राऊत उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मदतीबाबत वास्तववादी माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारताना महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य करायचे आहे. हे सरकार सर्वसामान्यांना आपले वाटेल या दिशेने प्रयत्न असतील.
सर्वांना अभिमान वाटावा अशा रायगड संवर्धनाच्या 20 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रथम मंजूरी देण्याचे भाग्य मिळाले आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Share your comments