1. बातम्या

मराठवाडा विभागीय क्रॉपसॅप अंतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्‍न

KJ Staff
KJ Staff


परभणी:
कृषी विभागातील कर्मचारी व कृषी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ यांच्‍या प्रयत्‍नांमुळे पिकांवरील कीड व्‍यवस्‍थापनाबाबतचे क्रॉपसॅप मॉडेल यशस्‍वी झाले आहे. या प्रकल्‍पात केलेल्‍या कामाच्‍या अनुभवामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आत्‍मविश्‍वास वाढीस लागला असुन शेतकऱ्यांचा कृषी विभागाकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला आहे, असे प्रतिपादन कृषी आयुक्‍त श्री. सुहास दिवसे यांनी केले. महाराष्‍ट्र शासनाचा कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील कृषी कीटकशास्‍त्र विभाग यांच्‍या वतीने कीड-रोग सर्वेक्षण प्रकल्‍प (क्रॉपसॅप) अंतर्गत दिनांक 30 एप्र‍िल रोजी परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात आयोजित खरीप हंगामपुर्व मराठवाडा विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, कृषी आयुक्‍तालयातील संचालक (विस्‍तार व प्रशिक्षण) श्री. विजयकुमार घावटे, लातुरचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. तुकाराम जगताप, औरंगाबादचे श्री. प्रतापसिंह कदम, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.श्री. दिवसे पुढे म्‍हणाले की, देशाची अर्थव्‍यवस्‍था संपुर्णपणे कृषी क्षेत्रावरच अवलंबुन असुन तापमान वाढीचा सर्वाधिक परिणाम कृषी अर्थव्‍यवस्‍थेवर झाला. राज्‍याचा कृ‍षी विभाग ही महत्‍वाची विकास यंत्रणा असुन कृषी विभागाच्‍या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने शेतकऱ्यांना सेवा द्यावी. कृषी तंत्रज्ञान नेहमीच अद्ययावत ठेवा, हंगामापुर्वीच कामाचे योग्‍य नियोजन करा, संवाद कौशल्‍य आत्‍मसात करा, माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचवा. क्रॉपसॅप प्रकल्‍पात कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, मका व ज्‍वारी वरील लष्‍करी अळी, ऊसातील हुमणी आदी किडींचा समावेश करण्‍यात आल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.  

अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, बदलत्‍या हवामान परिस्थितीत पिकांवरील कीड व रोगांचे स्‍वरूप बदलत आहे, पिकांवरील दुय्यम कीड आज मुख्‍य कीड होत आहे. त्‍याप्रमाणे क्रॉपसॅप प्रकल्‍पात वेळोवेळी बदल करण्‍यात आला. गतवर्षी क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत कृषी विभागातील कर्मचारी, कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यी यांच्‍या समन्‍वयाने राबविण्‍यात आलेल्‍या मोहीमेमुळे शेतकरी कापसावरील गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन चांगल्‍या प्रकारे करू शकले, यामुळे शेतकऱ्यांचे किडींपासुन होणारे नुकसान बऱ्याच अंशी कमी झाले. याही वर्षी पिकांवरील कीड व्‍यवस्‍थापनाबाबत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्‍यासाठी कृषी विभाग व विद्यापीठाच्‍या समन्‍वयाने कार्य करूया. याबाबत मनुष्‍यबळाच्‍या प्रशिक्षणाची संपुर्ण जबाबदारी परभणी कृषी विद्यापीठ घेईल, असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री. तुकाराम जगताप यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले. तांत्रिक सत्रात कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनावर डॉ. पी. आर झंवर यांनी तर मका पिकावरील लष्‍करी अळीचे एकात्मिक व्‍यवस्‍थापन यावर डॉ. बी. व्‍ही. भेदे यांनी व ऊसावरील हुमणीचे व्‍यवस्‍थापनावर डॉ. अनंत बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत नांदेडचे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. रविशंकर चलवदे, परभणीचे श्री. विजयकुमार पाटील, हिंगोलीचे श्री. व्‍ही. डी. लोखंडे, लातुरचे श्री. संतोष आळसे, उस्‍मानाबादचे श्री. उमेश घाटगे, जालनाचे श्री. बाळासाहेब शिंदे, औरंगाबाद डॉ. तुकाराम मोटे आदींसह मराठवाडयातील आठही जिल्‍हयांतील कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठातील समन्‍वयक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters