देशात मोठ्या प्रमाणात विकासाबाबत सखोल अभ्यास सुरु आहे. त्या अनुषंगाने आधुनिकीकरणावर भर दिला जात आहे. शिवाय महामार्गांची निर्मिती करून राज्यातील प्रत्येक शहरांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करून हे प्रकल्प उभे होत आहेत. त्याचा मोबदला देखील सरकार देत असून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ३ हजार शेतकऱ्यांना ६०० कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातील ५० कोटी ८१ लाख रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया गतीने सुरू आहे. तर निवाडे जसे मंजूर होतील, तशी मोबदल्याची रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा केली जात आहे.
रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ४९ गावांतून जातो. यामध्ये शाहूवाडी २५, पन्हाळा १०, करवीर ८, तर हातकणंगले तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील एकूण २८९ हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ गावांतील १३६ हेक्टरचे, तर दुसऱ्या टप्प्यात २१ गावांतील १५३ हेक्टरचे संपादनाचे काम केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भूसंपादनाच्या कामाला सध्या वेग आला असून सहा गावांचे निवाडे पूर्ण झाले आहेत.
या गावांमधील शेतकऱ्यांना अखेर ५० कोटी ८१ लाख रुपये मोबदला म्हणून दिले आहेत. तसेच उर्वरित गावांतील निवाडे जसे होतील, त्यानुसार मोबदला देण्यात येणार आहे. मोबदल्याची एकूण रक्कम ६०० कोटींपर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र जशी मोबदल्याची रक्कम निश्चित होत आहे, तशा तक्रारी, वाद-विवादही वाढत चालले आहेत. सामाईक हिस्सा, स्वतःचे क्षेत्र, एकट्याला मोबदला नको, अशा आशयाच्या अनेक तक्रारी भूसंपादन कार्यालयाकडे येत आहेत.
त्यामुळे दररोज कार्यालयात गर्दी इतकी वाढत चालली आहे की, अधिकारी, कर्मचाऱ्यांना उसंत मिळत नसल्याचे चित्र आहे. या तक्रारी केवळ गावागावांतूनच नव्हे, तर पुणे, मुंबई सारख्या शहरांमधून गुजरात, गोवा आदी राज्यांतूनही आल्या आहेत. याबाबत एक तक्रार तर थेट अमेरिकेतून आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सध्या वडिलोपार्जित जमिनीवर मुलीचाही हक्क असल्याचे सांगत मोबदल्यात समान हक्क मागितला जात आहे.
शिवाय एका बहाद्दराने लग्नाचा व्हिडिओ अधिकाऱ्यांकडे पाठवून कन्यादानाला मुलीचे वडील देखील उपस्थित न राहिल्याचा दाखला देत हक्क का सोडावा? असा प्रश्न आपल्या तक्रारीत केला आहे. यामुळे आता अधिकाऱ्यांचे काम यामुळे वाढले आहे. असे असताना लवकरात लवकर हा रोड व्हावा, अशी मागणी देखील अनेकजण करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
कारखानदारांवर टीका करू नका, अतिरिक्त उसावर शेतकऱ्यांनीच आहे चूक? वाचा खरी कारणे..
शेवटी ती बातमी आलीच!! जनधन खाते धारकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, दर महिन्याला मिळणार पैसे..
उसाच्या शेतात आडोसा घेऊन सुरु होता धक्कादायक प्रकार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Share your comments