अहमदनगर जिल्ह्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील संगमनेर एपीएमसीमध्ये कांद्याच्या दरात थोडी वाढ बघायला मिळत आहे. मित्रांनो आपणास सांगू इच्छितो की संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट मध्ये सोमवार ते शुक्रवार यादरम्यान कांद्याचा लिलाव होत असतो. आठवड्यातून केवळ पाच दिवस या बाजार समितीच्या आवारात कांद्याचा लिलाव होत असतो. संगमनेर व आजूबाजूच्या परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला कांदा विक्रीसाठी या एपीएमसीमध्ये आणत असतात.
नगर जिल्ह्यातील ही एक महत्वाची कांदा बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मागील आठवड्याच्या सोमवार ते शुक्रवार या दिवसाच्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला तब्बल 1400 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. दोन नंबरच्या कांद्याला 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर होता. गोल्टीला आणि तीन नंबरच्या कांद्याला जवळपास एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर होता. खाद 551 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जात होती. संगमनेर एपीएमसीमध्ये मिळत असलेला दर शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढा नाही मात्र यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र परिसरात बघायला मिळत आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनार यांनी यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले की, कांदा विक्रीस आणताना सकाळच्या लिलावासाठी आणावा तसेच कांदा नेहमी 50 किलोच्या बारदानात वाळवून, निवडून विक्रीसाठी आणावा. असे केल्यास निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो, असेदेखील बाजार समितीचे सभापती महोदय यांनी स्पष्ट केले.
यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकचा खर्च करून कांदा लागवड केली होती. मध्यंतरी हवामान बदलामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात अजुनच वाढ झाली होती यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला तरच शेतकऱ्यांना चार पैसे शिल्लक राहणार आहेत. सध्या राज्यात कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे मात्र संगमनेर एपीएमसीमध्ये थोड्या प्रमाणात का होईना कांद्याच्या दरात वाढ झाली असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गालावर हसू उमटले आहे.
Share your comments