1. बातम्या

बदलत्या हवामान स्थितीत मराठवाड्यात एकात्मिक शेती पद्धती फायदेशीर

औरंगाबाद: कमी पावसामुळे मराठवाड्याचा खरीप हंगाम आणि येणारा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. जमिनीत ओल अत्‍यंत कमी झाली असुन खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस मुख्‍य पिके सुकत आहेत. शेती पुढील नैसर्गिक संकटे कमी होत नाही, केवळ त्‍यांचे स्‍वरूप बदलत आहे. बदलत्या हवामानाचा विचार करता मराठवाड्यात एकात्मिक शेती पद्धती शेतकरी बांधवांसाठी निश्चित आधार ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले.

KJ Staff
KJ Staff


औरंगाबाद:
कमी पावसामुळे मराठवाड्याचा खरीप हंगाम आणि येणारा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. जमिनीत ओल अत्‍यंत कमी झाली असुन खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस मुख्‍य पिके सुकत आहेत. शेती पुढील नैसर्गिक संकटे कमी होत नाही, केवळ त्‍यांचे स्‍वरूप बदलत आहे. बदलत्या हवामानाचा विचार करता मराठवाड्यात एकात्मिक शेती पद्धती शेतकरी बांधवांसाठी निश्चित आधार ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्‍या सभागृहात दिनांक 24 सप्‍टेबर रोजी रब्बी विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्ला समितीची बैठक पार पडली, बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, औरंगाबादचे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, लातुरचे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. जी. मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, मराठवाडयात फळबाग लागवडीखालील क्षेत्र मोठया प्रमाणात असुन यावर्षी या फळबागा वाचविण्‍याचे मोठे आव्‍हान आहे. सन 2012 या अवर्षण प्रवण वर्षात विद्यापीठाचा विस्‍तार शिक्षण संचालक असतांना कृषि विभागाच्‍या सहकार्याने मोसंबी फळबाग वाचविण्यासाठी मोठे अभियान राबविण्‍यात आले होते, यासारखे अभियान याही वर्षी राबविण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

बैठकीत संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे आवर्जून जिल्ह्यानिहाय प्रश्नावर विशेष लक्ष देऊन तो प्रश्न त्‍वरीत संबंधित कृषी शास्त्रज्ञाकडून सोडवून घेत होते. विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान व सल्‍ले विविध माध्‍यमातुन शेतकरी बांधवांच्या बांधापर्यत गेले पाहिजे, या परिस्थितीत कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम उभे आहे असा विश्‍वास शेतकऱ्यांना वाटला पाहिजे, असे मत व्‍यक्‍त केले.  

बैठकीस विद्यापीठाच्या वतीने विविध कृषी विभागाचे प्रमुख, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी,विभागीय विस्तार कृषी विद्यावेत्ता, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आदींचा सहभाग होता. बैठकीत सद्यस्थितीतील खरिप पिके व येणाऱ्या रब्बी हंगामाबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागाच्या वतीने मांडण्‍यात आलेल्‍या विविध शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरणाबाबत चर्चा करण्‍यात आली. विद्यपीठ विकसित रब्बी पिकांचे बियाणे उपलब्ध असल्याचे संबंधित शास्त्रज्ञाने सभागृहास अवगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. एस. आर. जक्कावाड यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राष्‍ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

English Summary: Climate change situation integrated farming in marathwada is beneficial Published on: 24 September 2018, 09:18 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters