मुंबई: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित ‘हवामानावर आधारित फळपीक विमा योजना’ सन 2018-19 या सालासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी विम्याचा लाभ द्यावा, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. विधानभवनात आज अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत समस्यांचे निराकरण करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनीही यासंदर्भात अधिक माहिती दिली.
श्री. पटोले म्हणाले, पिक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अधिक जागृती निर्माण करावयाची गरज असून, संबंधित विभागाने त्यासंदर्भात कारवाई करावी. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना रब्बी हंगाम 2018 अंबिया व मृगबहाराची नुकसान भरपाई जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्यात यावी. तसेच जे शेतकरी पाहणी न झाल्याने आणि कमी तापमान या निकषावर नुकसान भरपाईपासून वंचित राहिले अशा शेतकऱ्यांनाही न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने पिक विम्याची भरपाई द्यावी, असे निर्देश श्री. पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी भविष्यात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीस विस्तार व प्रशिक्षण मंडळाचे संचालक एन. टी. शिदोळे, मुख्य सांख्यिकी उदय देशमुख, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अशोक मानकर, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते.
Share your comments