Nandurbar News : अवकाळी पावसाचा नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसामुळे पिकावर आता विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात घट झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
मिरचीचे आगार म्हणून नंदुरबार जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करतात. पण मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकावर चुरडामुरडा आणि डवणीचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या रोगांमुळे मिरचीच्या पिकाची पानं आखडतात. त्याचप्रमाणे मिरची ही वेडी वाकडी आकारात येत असते. तसंच झाडाचे पोषण होत नसल्याने मिरची उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत.
पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा उत्पादनात घट झाली आहे. उत्पादन खर्चही निघेले का नाही? हे सांगता येत नाही. तसंच यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे, असे या भागातील शेतकरी सांगतात.
दरम्यान, आधी दुष्काळी स्थिती त्यानंतर अवकाळीचा फटका यामुळे जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता पुन्हा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झालेत. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Share your comments