शेतकरी राजा आपले उत्पन्न वाढवण्यासाठी नगदी पिकांची लागवड करायला पसंती दर्शवीत आहेत. पण नगदी पिकांची लागवड करून उत्पन्न पदरी पडेलच हे काही सांगता येत नाही! जर निसर्गराजाची अवकृपा असली तर नगदी पिकांची जरी लागवड केली तरी नकद प्राप्त होत नाही. असेच निसर्गाच्या अवकृपेचे एक उदाहरण सामोरे आले आहे.
विदर्भ प्रांतातील नागपूर जिल्ह्यामध्ये, रामटेक तालुक्यात मानापूर शिवारात चाळीस एकरावर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा ह्या शिवारातील शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रावर संकटाचे अंबार घेऊन येणाऱ्या अवकाळीने या भागातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवून नेले आहे. परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, या शिवारातील शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर महागड्या औषधंची फवारणी केली मात्र मिरचीचे पीक काही सुधारण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे मिरचीला आलेला लाखोंचा खर्च, बळीराजाची मेहनत, आणि याही पलीकडे बोलायचं झाले तर शेतकरी राजांने पाहिलेले स्वप्न! हे सार निसर्गाच्या अवकृपेने मातीमोल करून टाकले.
शिवारातील मिरचीवर किडिंचा हल्ला
अवकाळीमुळे राज्यातील वातावरणात मोठा विपरीत बदल घडून आला, ह्या वातावरणातील बदलाचा फटका मानापूर शिवारातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सर्व्यात जास्त बसला आहे, ह्या वातावरणामुळे मिरचीवर चुराडा आणि फुलकीडीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे, ह्या किडिंवर महागड्या औषधंची फवारणी करून देखील नियंत्रण मिळवता आले नाही त्यामुळे, मिरचीचे पीक शेतकऱ्यांनी उपटण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशा उराशी बाळगून मिरचीची लागवड केली मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.
तालुक्यात मिरचीचे क्षेत्र वाढण्याचे कारण
रामटेक तालुका हा भात लागवडीसाठी ओळखला जातो. पण काही शेतकऱ्यांनी यात बदल केला, आणि मागील वर्षी मिरची लागवड केली याचा फायदा झाला. म्हणुन यावर्षी मिरचीची अधिकची लागवड बघायला मिळाली. तालुक्यात एकट्या मानापूर शिवारात यावर्षी 40 एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड बघायला मिळाली. शेतकऱ्यांनी सांगितलं की, मिरची लागवडीसाठी प्रति एकर 80 हजार रुपयांचा खर्च केला परंतु एवढा खर्च करून काही फायदा झाला नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे या शिवारातील मिरची उत्पादक शेतकरी मोठया संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.
Share your comments