मुंबई
राजस्थानच्या सीकर येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्ताचे वितरण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला आहे. यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, अपर मुख्य सचिव अनुपकुमार उपस्थित होते.
वर्षा निवासस्थानी ठाणे आणि रायगड मधील शेतकरी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
तसंच “राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे. पेरणी झाली का? नागली घेता का? भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत जास्त काम होईल, शिवाय मनुष्यबळही कमी लागेल. नागली, वरईसह आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करा, यातून उत्पन्न वाढण्यास मदत होईल" असा सल्लाही मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आज १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. राज्यातील ८५.६६ लाख पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून सुमारे १ हजार ८६६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Share your comments