अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर असून ते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. मात्र भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्याला मराठा आंदोलकांकडून जोरदार विरोध दर्शवण्यात आला आहे. येवल्याच्या सोमठानदेश गावातील ज्या मार्गावरून छगन भुजबळ गेले त्या मार्गावर मराठा आंदोलकांनी चक्क गोमूत्र शिंपडलं आहे. तसेच भुजबळांचा ताफा आडवत 'भुजबळ गो बॅक'च्या घोषणा देखील देण्यात आल्या आहेत.
राज्यात मागील अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा-ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामुळे छगन भुजबळांच्या पाहणी दौऱ्याला मराठा आंदोलकांनी जोरदार दर्शवण्यात आला.
तसेच छगन भुजबळ त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध करताना दिसत आहे. आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका. तसंच शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, पण आमच्या बांधावर येण्याचा अट्टाहास का? असा प्रश्नही मराठा समाजाने उपस्थित केला आहे.
दरम्यान यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, जो शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलतो, घटनेच्या पदावर बसून जातीमध्ये तेढ निर्माण करतो, त्यामुळे त्याने शेतात जायला नको पाहिजे. उगाच त्या जमीनवाल्या शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. हा माणूस पनवती असल्यासारखा आहे. तसेच, मंत्री गेल्यावरच शेतकऱ्यांचं चांगलं होतं असे काही नाही. प्रशासन आहे ना, प्रशासनाने पंचनामे करायला पाहिजेत असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Share your comments