जालन्यात आज 17 नोव्हेंबर रोजी ओबीसी नेत्यांची जाहीर सभा पार पडत आहे. या आरक्षण बचाव एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रामक भुमिका मांडली आहे. छगन भुजबळांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून मनोज जरांगे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. यावेळी, याद राख माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा इशारा भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.
तसेच मराठा समाजात आजही अनेक समंजस नेते आहेत, याच्या कोठे नादी लागलाय, ह्या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. आरक्षण म्हणजे गरिबी हटविण्याचा कार्यक्रम नाही. वर्षानुवर्षे पिचलेल्या लोकांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे. आरक्षण काय आहे, हे एकदा समजून तर घे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आरक्षणासाठी ५८ मोर्चे निघाले, आम्ही त्याला विरोध केला नाही. मी विरोधी पक्षात असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा ठराव मांडला. मराठ्यांना आरक्षण द्या, असे मी त्या वेळी सांगितले. पण ते सर्वोच्च न्यायालयात अडकले. त्यावर मार्ग काढा, अभ्यास करा. ओबीसींमध्ये सुरुवातीला २५० जाती होत्या. त्यात पुन्हा काही आयोगाच्या आदेशानुसार समाविष्ठ केल्या. त्याला आम्ही कुठं विरोध केला. पण तुम्ही कायद्याने येत नाही. दादागिरी आणि गडबड करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही सरकारकडून योजना घ्या, आमचं काहीही म्हणणं नाही. पण आम्हाला देताना नाकं मुरडू नका असंही छगन भुजबळ म्हणालेत.
Share your comments