मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत 40 लाख 77 हजार खातेधारकांच्या बँक खात्यात 17 हजार कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून खावटीसाठी कर्ज काढली आहेत, त्या शेतकऱ्यांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत करुन हे कर्ज माफ करण्यात यावे, असा निर्णय उपसमितीने घेतला.
मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उपसमितीची आढावा बैठक झाली. या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 जाहीर केली होती. या योजनेत खावटी कर्जाचा समावेश नव्हता. अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खावटी कर्ज माफ करावी, अशी मागणी होती. याचा अभ्यास करुन ज्या बँकेतून शेतकऱ्यांनी खावटीसाठी कर्ज घेतली आहेत, त्या शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 मध्ये समावेश करुन हे कर्ज माफ करण्यात यावे, असा निर्णय उपसमितीने घेतला.
Share your comments