1. बातम्या

ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्न

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
शेती क्षेत्रावर हवामान बदलाचा आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे विपरीत परिणाम होऊन त्यामुळे कृषी उत्पादनात घट होते. ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ही परिस्थिती बदलता आल्यास त्याचा फायदा शेतीच्या शाश्वत विकासासाठी होईल, शिवाय शेतकऱ्यांच्या जीवनमानात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सेंटरच्या माध्यमातून या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सेंटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे हे केंद्र मुंबई सुरु केल्यामुळे त्याचा उपयोग करुन घेण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा शेती आणि जलसिंचन क्षेत्रासाठी वापर करण्यात येईल. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमतेबरोबरच अचूक परिणाम साध्य करण्यास मदत होणार आहे.

कृषी क्षेत्रावर बदलत्या हवामानाचा दुष्परिणाम जाणवतो. सोबतच किडीच्या प्रादुर्भावाचा देखील कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम जाणवतो. अशा वेळी ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरुन हवामानाची वेळीच माहिती आणि किडीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी आपण उपाय करु शकलो आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती क्षेत्र शाश्वत झाल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी नक्कीच होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्यात भारत नेटच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतीपर्यंत फायबर ऑप्टिक टाकण्यात येत असून त्याद्वारे प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात 26 जानेवारी 2019 पर्यंत अजून 10 हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जातील. तंत्रज्ञानाच्या वापरातून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणतानाच शेती क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters