उत्तर महाराष्ट्र ते लक्षद्वीप दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून अरबी समुद्राच्या पूर्व मध्य आग्नेय भाग आणि कर्नाटकदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असून ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर आणि ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच आंध्र प्रदेश व बंगालच्या उपसागर या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.
पश्चिम आसाम आणि हिमालय, पश्चिम बंगाल आणि सिक्किम दरम्यान समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेशाच्या ईशान्य परिसर ते पश्चिम राजस्थान दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र असून ते समुद्र सपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
उद्यापासून मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान देशातील इतर राज्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांपर्यत अनेक राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. काही राज्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पूर्वी उत्तर प्रदेश, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरा, तेलंगाना, आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे. मागील २४ तासात पश्चिम बंगालमधील अनेक भागात पाऊस झाला. पुर्वी राजस्थान, आंध्र प्रदेशातील काही भागातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आसाम, महाराष्ट्र, छत्तीसगडमधील अनेक भागात पाऊस झाला.
Share your comments