बंगालच्या उपसागराच्या उत्तर आणि वायव्य भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता काही प्रमाणात वाढली आहे. त्यांचे रुपांतर चक्राकार वाऱ्यांमध्ये झाले आहे. त्यामुळे विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. मात्र ही स्थिती अधिक सक्रिय नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. याबरोबर दक्षिण उत्तर रायलसीमा दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. दरम्यान राजस्थानच्या नैत्रऋ भागात काही ददिवसांपासून मॉन्सूनची आस असलेला पट्टा उत्तर भागात ते बंगालच्या उपसागरादरम्यान सक्रिय आहे. त्यामुळे उत्तर भारतातील काही पाऊस पडत आहे. दरम्यान एक जूनपासून राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पावासाचा चांगला जोर असल्याने धरणेही भरु लागली आहेत. दरवर्षी दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाला. मात्र राज्यातील इतर पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक हजेर लावली.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार व तुळशी तलाव भरुन वाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून कमी प्रमाणाक पाऊस होत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस बरसल्याने धरणांतील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १२ धरणांतून सध्या विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा वगळता अन्य नद्याचे वाढणारे पाणी स्थिर झाले आहे. पाऊस कमी असल्याने पाटबंधारे विभाग येत्या दोन दिवसांत धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण आणखी कमी करण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून विसर्ग ३० हजार क्युसेकपर्यंत कमी झाल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर झाली.
Share your comments