मॉन्सूनने राज्य व्यापल्यानंतर राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तर कोकणातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज पालघर, ठाणे, रायगड, पुणे, आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, नाशिक, बीड, लातूर, अकोला, यवतमाळ, वर्धा येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान २ ते ३ दिवसात कोकण, गोवा, महाराष्ट्र, उप- हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्किम, ओडिसा, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये दमदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर ओडिशाच्या काही जिल्ह्यात पुढील तीन दिवसापर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे. उत्तर बंगालच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे. हैदराबाद ते तामिळनाडूपर्यंतच्या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.
हरियाणामध्ये मात्र उष्णतेचा कहर चालू आहे. परंतु पुढील ४८ तास हरियाणासाठी धोकेदायक असणार आहे. वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरातच्या दक्षिणी किनारपट्टी म्हणजेच अरबी समुद्राजवळ एक चक्र बनले आहे. यामुळे या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी चार दिवसातच महाराष्ट्राला व्यापले आहे. आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यातील धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. नाशिक जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे.
Share your comments