दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण आहे. हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावादेखील होत आहे.
मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होणार आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली. दरम्यान सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती कीड-रोगांसाठी पोषक ठरत आहे. राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे सावट असून शनिवारपर्यंत विविध भागांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
डिसेंबरप्रमाणेच जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही. सध्या पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातही पावसाळी स्थिती आहे. त्यासह आता राज्याच्या जवळ म्हणजेच दक्षिण मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे.
या भागातून कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमान १५ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. येत्या काही दिवस राज्यात थंडी कमी स्वरुपाची राहणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात ९ जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात ८ जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.
Share your comments