काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान आजही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवा्यातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे. उद्याही या भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या गुजरातच्या दक्षिण भागात व परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.
अरबी समुद्राचा ईशान्य भागात चक्रवाताची स्थिती असून ते पाकिस्तानच्या दक्षिण भागापर्यंत आहे. उत्तर प्रदेशाच्या ईशान्य भाग ते मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग दक्षिण उत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. येत्या रविवारी बंगाल उपसागराच्या ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. राज्यात आणि उद्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतील. शनिवारी कोकण वगळता अनेक ठिकाणी उडीप राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल. रविवारी कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावासाच्या सरी बरसतील.
Share your comments