हवामान विभागाच्या मते ३० सप्टेंबरपासून मॉन्सून दिल्लीसह इतर राज्यातून माघारी निघाला आहे. दरम्यान आज महाराष्ट्र राज्यातील मध्य भाग आणि मराठवाड्यातील काही भागात हवामान ढगाळ असणार आहे, त्यामुळे आज नाशिक, नगर, पुणे, तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर जिल्ह्यात आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तसेच कमाल तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, बुधवारी दुपारपासून अचानक ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा कमी झाला होता. येत्या चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठावाड्यात हलका पाऊस होण्याची शक्याता आहे. विदर्भात उद्या शुक्रवारी तुरळक सरी पडतील तर शनिवारपासून उन्हाचा चटा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसांपुर्वी परतीच्या प्रवासाला निघालेला मॉन्सून हळूहळू माघारी निघाला आहे. त्यातच वाऱ्यांची स्थिती दिशाही बदलली असून हवेतील आर्द्रता कमी झाल्याने मॉन्सूनने पंजाब, राजस्थान, हिमालयाच्या पश्चिम भाग, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, या भागातून माघार घेत लख्मीपूर खेरी, शहजानपूर, अलवार, नागौरपर्यंत दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत उत्तर प्रदेश राजस्थानसह मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतणार आहे.
दरम्यान येत्या २४ तासात देशातील काही राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिशा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगालमधील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तर सिक्कीम, छत्तीसगडचा दक्षिणी भाग, तेलगंणातील काही भागासह तमिळनाडू, केरळ, अंदमान निकोबार द्विपसमूहातील काही भागातही मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
Share your comments