राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असून पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. आज खानदेशातील धुळे. नंदुरबार, जळगाव, तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सांगली , सोलापूर आणि मराठवाड्याील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी, या जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पाच ते सहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी परिसरात असलेले चक्रवाताची स्थिती विरु गेली आहे. त्यामुळे राज्यातील पावासाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशचा पुर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र असून काही भागात चक्रवाताची स्थिती आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ हवामानासह कडक ऊन पडेल. तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या सरी बरसतील. आज कोकणतील सर्व जिल्हे, पुणे , कोल्हापूर, सातारा व विदर्भातील सर्व जिल्ह्यात हलक्या काही ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा होईल. राज्यात उद्या नांदेड, लातूर, उस्मानाबादेतील काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर कोकण , मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक सरी पडतील.
रविवारपासून राज्यातील काही भागात काही अंशी ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही भागात ऊन असेल यामुळे उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अनेक ठिकाणी सोमवारपासून पाऊस सुरू होता. सलग तीन दिवस पावसाने जिल्ह्यांना झोडपून काढले. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. दरम्यान तीन दिवसानंतर बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. भात शेतीत शिरलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
Share your comments