राज्यातील काही भागात ढगाळ हवामान असून पावसासाठी पोषक हवामानाची स्थिती तयार झाली आहे. आज आणि उद्या रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. तर विदर्भातील काही ठिकाणीही पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
छत्तीसगडचा दक्षिण- उत्तर भाग आणि अरबी समुद्राच्या आग्नेयेस, कर्नाटक आणि उत्तर केरळ परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. राज्यातील काही भागात ढगाळ हवामान असून पावासासाठी पोषक हवामानाची स्थिती आहे. आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागात ऊन पडत असल्याने शेतातील ओलाव्याचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांवर रोग किडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी किड- रोग व्यवस्थापनात गुंतले असल्याचे दिसून येते.
सध्या तुरळक ठिकाणी हलका ते मध्य म स्वरुपाचा पाऊस होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यत मध्य महाराष्ट्रातील अकोले येथे ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यासह पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. कोकणात ठाणे, पालघर, रायगड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
मध्यप्रदेशच्या वायव्य भागात आणि राजस्थानच्या पश्चिम भागात चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. राजस्थानच्या वायव्य भागातही वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. मॉन्सूनची आस असलेला पट्टा बिकानेर ते दक्षिण आसामपर्यंत सक्रिय आहे. तसेच बिहार व पश्चिम उत्तर प्रदेश भागातही वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर उडिशा ते बिहार दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
Share your comments