1. बातम्या

मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता


मॉन्सून सक्रिय असल्याने कोकणासह राज्याच्या विविध भागात वरुण राजा दमदार बरसत आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. विदर्भ, मराठावाड्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्राती तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान मुंबईसह कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा दणका सुरु आहे. रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. खानदेश, वऱ्हाडातही पावसाचा जोर असल्याने नद्यांना पाणी आले आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या फालोदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर हवेचे पूर्व- पश्चिम जोडक्षेत्र आहे, तर दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत समुद्र किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यातच अरबी समुद्रावरुन वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्पाचा पुरवठा होत असल्याने कोकणासह राज्यात मॉन्सून सक्रिय आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापुरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासह देशातील इतर राज्यातही मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागानुसार, येत्या काही तासात गुजरातमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होणार आहे. यासह जम्मू-कश्मीर, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, गिलगित - बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, उत्तर प्रदेश, आणि बिहारच्या तराई परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. झारखंड, पंजाब, हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेश, पूर्वी राजस्थान, दिल्ली -एनसीआरमधील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान राज्यात वरुण राजा दमदार बसरत असल्याने अनेक धरणात पाणीसाठा वाढला आहे. हातनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने तापी नदीला पूर आला आहे. तर पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असल्याने कोयना, राधानगरी धरणांतूनही पाण्याच विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters