राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. आज मराठावाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात कडकडाट वादळी पाऊस पडेल. तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापुरात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील तीन ते चार दिवस कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. बुधवारपासून या भागात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही भागातही मुसळधार पाऊस होईल. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार असून खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. दम्यान आज मराठवाड्यात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. लातूर, बीड जिल्ह्यांत काही प्रमाणात पाऊस होईल. तर मंगळवारी औरंगाबाद वगळता इतर भागात ढगाळ हवामान राहिल. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल. दरम्यान मागील २४ तासात राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे.
मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि वऱ्हाडातील काही भागात जोरदार पाऊस झाला. नदी नाल्यांना पूर आल्याने पिकांसह शेतजमिन खरडून गेल्या आहेत. सोयबीनला झाडावरच कोंब फुटले तर अनेक ठिकाणी कपाशी पीक पाण्याखाली गेले. द्राक्षबागांमध्ये पाणी साचून काही ठिकाणी ऊस आडवा झाला. मराठावाड्यातील औरंगाबाद जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे करपरा, दुधना , इंद्रायणी, पूर्णा, नद्यांना पूर आला. नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, बाजरी, मका, या पिकांना फटका बसला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी शेताचे बांध ओलांडून पाणी वाहिले.
Share your comments