राज्यात मॉन्सून पावसाला जोर वाढण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठावाड्यातील काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि गुजरातच्या परिसरात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज कोकणात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. तर उद्या कोकणात आणि शनिवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. ३ आणि ४ जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होईल असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय देशातील इतर राज्यातही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या मते, पुढील काही तासात हरियाणाच्या करनाल, यूपीच्या नजियाबाबाद, बिजनौर, मुझफ्फरनगर, खतौली, हस्तिनापूर आणि चांदपूरमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. दिल्ली - एनसीआरमध्ये मात्र अजून तापमानाचा पारा चढलेला असून दमट वातावरणामुळे नागरिक हैरान झाले आहेत. पुढील तीन - चार दिवसात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुर्वेकडील भारतात पुढील पाच दिवसापर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. पूर्वोत्तर बिहारमध्ये मॉन्सून ३ जुलैपर्यंत सक्रिय असेल. यादरम्यान येथील अनेक जिल्ह्यांना अर्लट राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान बिहारमध्ये यंदा मॉन्सून तीन दिवसाआधी आला आहे. मध्य भारतात मॉन्सून सक्रिय झाला असून मध्य भारतासह पश्चिमी किनारपट्टीवरील परिसरात पावसाच्या हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवाच्या किनारपट्टीवरही पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य भारतातील महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Share your comments