1. बातम्या

केंद्र शासनाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार 2018

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार- 2018’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषत: मुख्यमंत्र्याची महत्त्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 11 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार-2018’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषत: मुख्यमंत्र्याची महत्त्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 11 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्राला 4 पुरस्कार जाहीर 'जलयुक्त शिवार' व ' मागेल त्याला शेततळे योजनांची राष्ट्रीय पातळीवर दखल  

रोजगार हमी विभागाने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापनांतर्गत (एनआरएम) एकूण 70 हजार 514 कामे पूर्ण केली आहेत व यासाठी 1451.74 कोटींचा व्यय झाला आहे. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजना’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजना राबविण्यात आल्या व यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. या विभागाने एनआरएमच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला नकाशे पुरविले आहेत. राज्याच्या रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह मनरेगा आयुक्त, वरिष्ठ अधिकारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

मनरेगा अंतर्गत गडचिरोली जिल्हा सर्वोत्तम

गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा राज्यातील जिल्हा ठरला आहे. गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक यांच्या कुशल नेतृत्वात आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8 हजार 894 कामांना सुरुवात झाली यातून दोन वर्षात 39.12 लाख मनुष्य दिन निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तिक कामांवर भर देण्यात आला आहे आतापर्यंत जिल्ह्यात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी 6 हजार750 कामे पूर्ण झाली आहेत व यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. मनरेगा पुरस्काराचा बहुमान मिळविणाऱ्या गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक आणि विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना मनरेगा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


मनरेगा अंमलबजावणीत नागरी ग्रामपंचायत राज्यात सर्वोत्कृष्ट

मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातीलच गडचिरोली ब्लॉक मधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. सरपंच अजय मशाखेत्री यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायतीने एनआरएमची कामे हाती घेतली व लवकरच एनआरएमची 38 कामे पूर्णत्वास नेली या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्रीमती नूतन प्रकाश यांना उत्कृष्ट डाकसेवक पुरस्कार

ठाणे जिल्ह्यातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नूतन प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी या भागातील कामगारांना मनरेगा अंतर्गत विविध कामे व योजनांची माहिती दिली व या भागात मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कामगारही उपलब्ध करून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट कार्यासाठी जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल आणि राज्याचे मुख्य सचिव डी.के.जैन यांनी राज्य शासनाचे विभाग, अधिकारी तथा लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले आहे.

English Summary: central government mahatma gandhi national rural employment award 2018 Published on: 10 September 2018, 07:17 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters