केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. कोविड १९ च्या काळात अर्थात कोरोना काळात गेल्या काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. देशातील कांद्याच्या दरांमध्ये झालेली वाढ थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. डायरेक्ट्ररेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने एक नोटिफिकेशन काढून सगळ्या प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान बंगळुरु आणि कृष्णापुरम येथील कांद्यावरही निर्यातबंदी लागू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या कांद्याच्या निर्यातीवर बंदी लावण्यात आली नव्हती. मात्र आता या कांद्याच्या बाबतीतही सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे.
एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कांद्याच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. भारताने एप्रिल ते जून या कालावधीत १९.८ कोटी डॉलर किंमतीचा कांदा निर्यात केला. तर मागच्या संपूर्ण वर्षात ४४ कोटी डॉलर्सचा कांदा निर्यात झाला होता. भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका या देशांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होतो.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात वाढ होत आहे. कांद्याच्या प्रति किलो दरांमध्ये वाढ झाली आहे. १५ ते २० रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा ४५ ते ५० रुपये प्रति किलो या दराने मिळतो आहे. देशभरातच हे दर वाढले आहेत. दिल्लीतल्या आझादपूर बाजारात कांद्याचा घाऊक दर २६ रुपये ते ३७ रुपये प्रति किलो इतका होता. या कारणांमुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. तर यंदा दक्षिणेत खरीप कांद्याचे पावसाने नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातही खरीप कांद्याच्या लागवडीला फटका बसला आहे. मात्र निर्यातबंदी करताना सरकारने कोणतेही कारण दिलेले नाही. सरकारने त्याचा खुलासा करावा अशी मागणी नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी केली आहे. दरम्यान सध्याची भाववाढ ही निर्यातीमुळे आहे की, मालाचा पुरवठा कमी असल्याने झाली आहे, याचीही आकडेवारी उपलब्ध नाही. कांद्याला नुकताच भाव मिळत होता तोच सरकारने निर्यातबंदी लादल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : कांदा प्रक्रिया उद्योगातून मिळवा उत्तम नफा
दरम्यान निर्यात बंदी होताच राज्यातील बाजारपेठेत कांद्याचे दर कमी झाले आहेत. लासलगाव बाजार समितीत दुपारपर्यंत कांद्याचे दर तीन हजार रुपये क्किंटलपर्यंत गेले होते. मात्र जेएनपीटी बंदरातून कांदा पाठविला जात नसल्याचे लक्षात येताच दर घसरले. दुपारनंतर २७०० ते २८०० रुपयांपर्यंत दर खाली आले.
Share your comments