उसाच्या गाळप हंगामास दसऱ्याच्या मुहूर्तावर आजपासून सुरुवात होत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतात ऊस बऱ्यापैकी दिसत असून, साखरेचे उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षीही चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे १०१३ लाख टन उसाचे गाळप झाले होते.
यंदा त्याहून अधिक म्हणजे १०९६ लाख टन उसाचे गाळप होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या हंगामात १०६.४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते ११० लाख टनांपेक्षा अधिक होण्याचा अंदाज वर्तवला जातो. साखर निर्मितीत देशात उत्तर प्रदेशने आघाडी घेतली. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र आघाडीवर होता. यंदा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील साखर निर्मितीत फार फरक नसेल, असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. साखर निर्मितीत महाराष्ट्राने पुन्हा देशात पहिला क्रमांक पटकावावा, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू के ले आहेत. त्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त के ली आहे. चांगला पाऊस झाल्याने यंदा ऊस मोठय़ा प्रमाणावर गाळपासाठी येईल, असा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना उसाचे प्रचलित पद्धतीप्रमाणेच पैसे दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘एफआरपी’वरून राजकीय संघर्ष?
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे चुकते करण्यावरून राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी उसाचे पैसे द्यावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू के ले आहे. मात्र, एकरकमी पैसे देण्याची मागणी झाल्यास साखर कारखाने अडचणीत येतील, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती.
Share your comments