सोमिनाथ घोळवे
आज सकाळी शेतात जनावरांना कडवाळ काढण्यासाठी जात असताना समोच्या बांधावर "केकताड" वनस्पती दिसून आली. या वनस्पतीला मी लहान असल्यापासून गाव शिवारात पहात आलो आहे. पण अलीकडे खूपच कमी झाली आहे. घरी आल्यावर गाव शिवारातील वनस्पतीचा पूर्ण इतिहास वडिलांकडून समजून घेतला.
वडील सांगतात, की 1972 साली ही वनस्पती बराशी खोदल्या (दुष्काळी कामे- बांध बंदिस्त करणे) तेव्हा बांधावरील माती रानात घसरू नये यासाठी बांधावर लावल्या जात होत्या. पण त्याचा फायदा हा जमिनीची धूप थांबण्यासाठी होत असे. तसेच जलसंधारणासाठी खूपच उपयोगी होती. कारण या वनस्पतीच्या मुळाद्वारे पाणी मुरण्याचे प्रमाण जास्त आहे. फायदे अनेक असले तरीही एक तोटा आहे, तो म्हणजे बांधावर वनस्पती लावली असता, वसव्याने कासराभर (15 ते 20 फूट) पिके येत नाहीत. पण या वनस्पतीमुळे संरक्षण कुंपण चांगले होते. जेणेकरून पाळलेली जनावरे, जंगली जनावरे व इतर प्राणी यापासून पिकांचे संरक्षण होत असे.
कोरफडीसारखी दिसणारी "केकताड" ही वनस्पती. या वनस्पतीस समानार्थी घायपात असेही म्हणतात. ही अगेव्हसी कुलातील अगेव्ह प्रजातीची असून तिच्या अनेक जाती आढळून येतात. ही वनस्पती मूळची मेक्सिकोतील वनस्पती असून, भारतात पंधराव्या शतकात पोर्तुगीज लोकांनी ही आणली असल्याच्या काही नोंदी सापडत आहेत. भारतात या वनस्पतीची लागवड कर्नाटक, तमिळनाडू, केरळ व महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मात्र अलीकडे खूपच कमी प्रमाण झाले आहे.
पाने साधी, लांब, मांसल, टोकदार, बिनदेठाची, चिवट व मेणचट असतात. त्यांचा रंग करडा हिरवा असून दोन्ही कडांवर व टोकांवर तीक्ष्ण व लहान काटे असून शेंड्याला दणकट आणि कठीण काटा असतो. तो पायात रुतला की हाडाचा वेध घेतो. या वनस्पतीला प्रादेशिक हवामानानुसार दहा ते साठ वर्षांदरम्यान एकदाच फुलोरा येतो. दीर्घकाळ आयुष्य असणारे ही वनस्पती आहे. तर नव्याने येणारे कोंब गोळा करून इतर ठिकाणी नेहून लावावे लागतात. त्यातून नवीन सुरुवात होती. एकदा गाब्यातील कोंब येऊन मोठा बांबू झाल्यानंतर तो गाभा वळून जातो. त्या बांबूचा वापर जनावरांचा गोठा आणि घराच्या पत्र्याखाली आडू टाकण्यासाठी होत होता.
केकताडाची पानांचा रस सारक, आर्तवजनक व रक्तपित्तनाशक आहे. तसेच केकताडाचा रस अंगाला लागला तर खाज सुटते. शक्यतो मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात रस्त्याच्या व लोहमार्गाच्या दुतर्फा, कुंपणासाठी तसेच उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी ही वनस्पती लावतात.
केकताडाचे दावी वळत असतं. त्या दाव्याचे उपयोग जनावरांची दावी, जनावरांचा गोठा किंवा माणसांना राहण्याचा गोठा बांधताना लाकडे आणि पाचट बांधण्यासाठी उपयोग करण्यात येत असे. अनेकदा केकताडाच्या वाद्या काढून जनावरांचा चारा बांधण्यासाठी शेतकरी उपयोग करत असे. अलीकडे आधुनिकीकरणाच्या ओघात नवनवीन दरखंड येऊ लागल्याने केकताडाचा वापर करणे खूपच कमी झाले आहे. त्यामुळे हळूहळू केकताड काढून टाकण्यात येत आहे.
मवे लहान असताना पावसाळ्यात या केकताडाची पाने कापून पाण्यात आठ -12 दिवस भिजवून ठेवत असतं. नंतर पाण्यातून पिळून काढला की वाक शिल्लक राहत असे. त्या वाकापासून आजोबा दोरखंड तयार करत होते. अतिशय मजबुत आणि टिकाऊ दोरखंड असे. एकंदर काही तोटे वगळता, बहू उपयोगी असलेली ही वनस्पती हळूहळू दुर्मिळ होत चालली आहे.
(लेखक शेती , दुष्काळ , ऊसतोड मजुर प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाऊंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
Share your comments