नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थींना निधी वितरीत करण्याची पूर्व अट म्हणून आधारची माहिती संलग्न करणे शिथिल करायला मंजूरी दिली आहे. या योजनेअंतर्गत जमिनधारक कुटुंबांना वर्षाला 6 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. प्रत्येकी 2,000 रुपयांची चार तिमाही हप्त्यांमध्ये हे पैसे लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात.
या योजनेअंतर्गत 1 ऑगस्ट 2019 नंतरचा तिसरा हप्ता आधार संलग्न माहितीच्या आधारे दिला जाणार होता. मात्र निर्धारीत वेळेत आधार संलग्न करण्याचे काम 100 टक्के पूर्ण न झाल्यामुळे आधारची अट शिथिल करायला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. शेतकरी सध्या रब्बी हंगामाची तयारीत असतील आणि त्यांना बियाणं खरेदी, जमिन नांगरणी आणि अन्य शेतीसंबंधित कामासाठी पैशांची नितांत गरज भासेल, तसेच आता सणासुदीचा हंगाम सुरु होत असल्यामुळे देशातल्या गरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर अधिक ताण येईल.
आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या खात्याशी संलग्न न केल्यामुळे पुढील हप्ते जारी करायला विलंब होईल आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होईल. त्यामुळेच आधार संलग्न करण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्वरीत निधी उपलब्ध होऊ शकेल. 1 डिसेंबर 2019 पासून मात्र आधार संलग्न करण्याची अट लागू आहे.
Share your comments