मुंबई: Maharashtra Political Crisis: आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. राज्यातील घडामोडींना आता वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रात्री उशिरा भेट घेत महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिंद्ध करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे.
राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
शिवसेनेचे गटनेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. मंगळवारी, भाजपच्या गोटातून मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत रहायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे फडणवीस यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करुन राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे. असे फडणवीस म्हणाले.
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांची फायनल यादी समोर; वाचा यादी...
Share your comments