राज्यामध्ये बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली. राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याने पोल्ट्री उद्योगावर मोठं संकट आले होते.
परंतु सध्या बर्ड फ्लू नियंत्रणात असल्याने पोल्ट्री व्यवसायिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.या बर्ड फ्लूमुळे जळगांव जिल्ह्यात ३८ आणि नंदुरबार जिल्ह्यात ३१, असे एकूण ६९कोंबड्यांचा मृत्यू झाला. दरम्यान बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य इतर एका पक्षाची आकस्मिक मृत्यूची राज्यात नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये राज्यात मृत्यू आढळून आले नाही. राज्यात १६ फेब्रुवारी २०२१ रोजी एकूण ७० पक्षांमध्ये मरतुक झाली आहे. हे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आले असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.
कुक्कुटपालनातील आणि बदक पक्षांमधील नमुने होकारार्थी आल्यानुसार, क्षेत्रास “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात आले आहे. तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून १ किमीच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येते. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून ७,१२,१७२ कुक्कुट पक्षी (यात नवापूर जि. नंदुरबार येथील ५,७८,३६० पक्षी समाविष्ट); २६,०३,७२८ अंडी व ७२,९७४ किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाद्वारे बर्ड फ्लू रोग प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी याप्रमाणे नष्ट करण्यात आलेल्या अंडी, खाद्य व पक्ष्यांच्या मालकांना देण्यासाठी रु.३३८.१३ लक्ष निधी वितरीत केला असल्याची माहिती श्री.केदार यांनी दिली.बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना दि.१२. जानेवारी २०२१ नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मरतूक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून, आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
नियमांचे काटेकोर पालन करावे
सर्व पोल्ट्री मालकांनी जैव सुरक्षा उपाययोजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन श्री.केदार यांनी केले आहे.
Share your comments