शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून आजचा दिवस अधिवेशनात चांगलाच गाजला. यंदा राज्यात जवळपास ४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगत सरकारला चांगलेच धारेवर धरले. तर पुणे जिल्ह्यात देखील शेतकरी आत्महत्या होऊ लागल्याने त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शिवाय सरकारला विविध कामांना आर्थिक निधी उपलब्ध होता. मात्र शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच शेतकऱ्यांनी दिलेली कर्जमाफी कधी पूर्ण होणार असा विरोधकांनी मुद्दा लावून धरला.
तसेच शेतकऱ्यांसाठी घोषणा करून जाहीर केलेले ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार असे देखील विरोधकांकडून ठाकरे सरकारला विचारण्यात आले. याबाबत कोरोना परिस्थितीने सरकारकडे पैसे नसल्याचे उत्तर दिले गेल्याने विरोधक चांगलेच संतापले. सलग तीन वर्ष शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या घोषणांना पैसे नसल्याचा टोला विरोधकांनी लगावला तर कर्ज माफी दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप नव्याने कर्ज मिळाले नाही हेही सांगण्यात आले.
तसेच २०१९ मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी पासून शेतकरी अद्याप वंचित असल्याचे सांगण्यात आले. परिणामी जाहीर कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याचा अंदाज विरोधकांकडून बांधण्यात येत आहे. याबाबत जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान विदर्भ १३००, अमरावती ११२८ व औरंगाबाद ७७३ आत्महत्या ग्रस्तांचा आकडा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृत सादर केला. अनेक ठिकाणी हा आकडा वाढतच चालला आहे. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आता कर्ज परतफेड करावे लागते. कर्ज परतफेड न केल्यास त्या कर्जावर व्याज लावण्यात येते. तर हे व्याज ३६५ पूर्ण झाल्यावर लावण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली. यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अधिवेशनात विजतोडणी आणि शेतकऱ्यांच्या विषयावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनेकदा गोंधळ बघायला मिळाला.
Share your comments