गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आणि महावितरण यांच्यात वाद सुरु आहे. याचे कारण म्हणजे शेतीसाठी दिवसा वीज देण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. आता सांगलीत आक्रमक झालेल्या अज्ञात शेतकऱ्यांनी सांगली- इस्लामपूर रस्त्यावरील कसबे डिग्रज येथील महावितरणचे (MSEB) सब स्टेशन पेटवल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री शेतकऱ्यांनी हे सब स्टेशन पेटवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे येथे मोठा गोंधळ उडाला होता.
सध्या कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ते येथे ठाण मांडून आहेत. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने महावितरणचे सब स्टेशन पेटवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे होती. त्या सर्व कागदपत्रासह अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. हे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मिळावी ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, असे असताना मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. कोल्हापूरमध्ये शेतकरी आंदोलनाची धग असतनाचा आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी देखील दिवसा वीज द्यावी या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी वीज तोडली जात आहे. तसेच रात्रीची वीज दिली जात आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, आगीनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रात्री अग्निशमन विभागाचे कर्मचारी आग विजवण्याचे काम करत होते. पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले. असे असताना मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची धग सध्या राज्यात पसरत असल्याचे दिसून येत आहे. आता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या या मागण्या पूर्ण करणार का? हे लवकरच समजेल.
Share your comments