राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न पुढे आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. असे असताना आता राज्यात अजूनही ठिकठिकाणी ऊसाला आग लागण्याच्या घटना समोर येत आहे. तर काही ठिकाणी गाळपाअभावी शेतकऱ्याला ऊस पेटवून देण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी भयंकर अडचणीतून जात असल्याचे स्पष्ट होते. सध्या दोन दिवसात सातारा आणि पुणे जिल्ह्यातील ऊस जळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी मिळून जवळपास ५० एकर ऊस जळून खाक झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात बागरान खल्लाळ येथील अंदाजे २० तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जाधववाडी येथे ३० एकर ऊस जळाल्याची माहिती समोर येत आहे. कराड येथे शेजारील शेतकरी ऊसाचे पाचट जाळत असताना आग लागली तर जुन्नर येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. सातारा येथील १४ शेतकऱ्यांचा तर पुणे येथील ७ शेतकऱ्यांचा ऊस जाळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर सातारा येथील दुर्घटनेची नोंद तळबीड पोलीस स्टेशनला झाली आहे.
कराड येथील हिंदुराव कृष्णा जगदाळे, सर्जेराव कृष्णा जगदाळे, उत्तम रामचंद्र जगदाळे, प्रदीप हणमंत जगदाळे, प्रताप हणमंत जगदाळे, विष्णू परसु जगदाळे, विजय परसू जगदाळे, शंकर वामनराव घाडगे, बाळूताई अधिकराव घाडगे, राजेंद्रप्रसाद रामचंद्र चव्हाण, विजया आनंदराव सूर्यवंशी, दादू प्रकाश जावीर, विठ्ठल दादू जावीर व रामचंद्र नारायण जगदाळे यांचा तर जुन्नर तालुक्यात बबन जाधव, पाडुरंग जाधव, आत्माराम जाधव, ज्ञानदेव जाधव ,शरद बांगर, लक्ष्मण जाधव, राजेंद्र जाधव, अरूणा जाधव, दत्तु जाधव या शेतक-यांचा ऊस जळाला असुन या सर्व शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे.
तसेच पुण्यातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस अजूनही तोडला गेला नाही. यामुळे उसाला तुरे आले आहेत. तसेच अनेकांच्या उसाला तुरे आले आहेत. यामुळे आपला उसाचे गाळप होईल की नाही याबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. शेतकऱ्यांचे १६ महिन्यांचे ऊस होऊन देखील अजूनही रानातच आहेत.
Share your comments